खेड : आ. भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांनी या नियुक्तीचे स्वागत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रायगड पालकमंत्रीपदाच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय समीकरणांवरून कदम यांनी सवाल उपस्थित केले आहेत. बुधवारी माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत बोलताना त्यांनी याबाबत तोफ डागल्याने महायुतीतील कदम-तटकरे फड पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार असताना संख्याबळाच्या आधारे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळायला हवे होते, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली. मात्र हे पद अदिती तटकरे यांना मिळाले, हे नेमक्या कोणत्या राजकीय गणितात बसते? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. ‘सुनील तटकरे यांच्याकडे खासदारकी, त्यांच्या कन्या मंत्री आणि पुन्हा कन्येलाच पालकमंत्रीपद’, असा टोला लगावत कदम यांनी तटकरे कुटुंबावर निशाणा साधला. तसेच विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही तटकरे यांच्या मुलाला आमदारकी मिळाली. मग तटकरे यांच्याकडे नेमका कोणता ‘जादूटोणा’ आहे?, असा खोचक सवालही त्यांनी केला.
भरत गोगावले यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराला झेंडावंदनाच्या वेळी बाजूला उभे राहावे लागणे हे प्रोटोकॉलमध्ये बसणारे नव्हते, असेही कदम यांनी म्हटले. त्यामुळे पालकमंत्रीपदाच्या निर्णयासोबतच प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरूनही त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत कदम यांनी या प्रकरणातील काही भाग तटकरे यांच्या विरोधातील राजकीय घडामोडींशी संबंधित आहे का, अशी शंकाही व्यक्त केली. मात्र, या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी भरत गोगावले यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा रंगली आहे.