राजापूर : शहरातील विविध रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते सव्वापाचच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या घटनेत जवाहर चौक ते रानतळे जाणाऱ्या रस्त्यावर बँक स्ट्रीटजवळील मोठ्या पुलावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ०८ बीएफ १०८०) उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुरेंद्र सुधाकर आंबे (वय ४०, रा. रामेश्वरवाडी, पोंभुर्ले बुद्रुक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत जकात नाका ते जवाहर चौक जाणाऱ्या रस्त्यावर सुपर बाजारसमोर ईको कार (एमएच ०८ सीए ३४५८) उभी केल्याप्रकरणी जयमिन सुरेशभाई माकाने (३३, रा. कोळपे भुसारवाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तिसऱ्या घटनेत मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले सर्व्हिस रोडवरील बँक स्टॉपसमोर पांढऱ्या रंगाची दुचाकी उभी केल्याप्रकरणी अभिषेक परशुराम सागरे (२१, रा. हातिवले, कातळवाडी, ता. राजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. चौथ्या घटनेत जकात नाका ते जवाहर चौक जाणाऱ्या रस्त्यावर राजापूर कोर्टासमोर पांढऱ्या रंगाची दुचाकी उभी केल्याप्रकरणी रमेश नामदेव जाधव (६१, रा. चोरेवाडी, शिवाजीनगर, ता. राजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणांत भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८५ तसेच भारतीय दंडविधान कलम २८३ नुसार कारवाई करण्यात आली आहे.