राजापूर : सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी वळीव पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला असून ७३ घरे व गोठ्यांचे छप्पर उडून, झाडे कोसळून सुमारे १७ लाख १९ हजार ४२० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सरफरे यांनी दिली. या वादळात झाडावरून पडून दोघेजण जखमी झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रविवारी झालेल्या वादळी पावसात अनेक गावांतील घरांची पत्रे व कौले उडून गेली. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने नुकसान झाले. याचबरोबर वीज खांब कोसळून आणि तारा तुटल्याने महावितरणचे अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे १० ते १२ गावांतील दोन हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली असून काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ७३ घरे आणि गोठ्यांचे नुकसान नोंदविण्यात आले असून पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या अपघातात केळवली येथील यशवंत बाबी बेळणेकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. प्रभारी तहसीलदार सरफरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तर बांदिवडे येथील राकेश तानवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांच्या अवकाळी पावसानंतर सोमवारी हवामानात बदल झाला. दिवसभर स्वच्छ आकाश आणि कडक उन्हामुळे उष्म्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले.