Rajapur Railway Station 
रत्नागिरी

Ratnagiri News : राजापूर रेल्वे स्थानकावर अचानक प्‍लॅटफॉर्म बदलल्‍याने प्रवाशांची उडाली तारांबळ

सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभारण्‍याची नगरसेविका उर्मिला बाकाळकर यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूर रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. 28) प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी रेल्वे अचानक 2 वर येणार असल्याची घोषणा करण्यात आली. अचानक प्‍लॅटफॉर्म बदलल्‍याने प्रवाशांना ट्रॅक ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जावे लागले. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. नगरसेविका उर्मिला बाकाळकर या राजापूर रेल्वे स्थानकावर गेल्या असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी रेल्वे अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. या आलेल्या ट्रेनमध्ये मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस आणि मुंबईकडून आलेली तुतारी एक्सप्रेस यांचा समावेश होता. त्यावेळी येणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला प्लॅटफॉर्म नंबर १ वर सिग्‍नल मिळाला. परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या नेत्रावतीला बाजूला लुप लाइनवर थांबवले, अशी माहिती समोर आली आहे.

प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान, लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी कोणतीही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने साधी शिडी लावण्यात आली होती. त्या शिडीच्या सहाय्याने प्रवाशांना खाली ट्रॅकवर उतरून दुसऱ्या बाजूला जावे लागत होते. वयोवृद्ध प्रवाशांना अक्षरशः उचलून खाली उतरवावे लागत होते, तर काहीजण धोक्याचा सामना करत शिडीवरून उतरून ट्रॅक पार करत होते. हा प्रकार पाहून अंगावर काटा आल्याची भावना बाकाळकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT