शरद पळसुलेदेसाई
राजापूर : कोकण रेल्वेच्या मार्गावर राजापूर तालुक्यातील एकमेव असलेले राजापूर रोड रेल्वे स्थानक खोलगट भागात असल्यामुळे चढ उतार करण्यासाठी प्रवाशांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने लिफ्टची व्यवस्था करावी, अशी मागणी केली अनेक वर्षे सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून सातत्याने झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर संपूर्ण राजापूर तालुक्यासाठी परिपूर्ण असे एकमेव राजापूर रोड रेल्वे स्थानक असून विद्यमान तेथे कोकणकन्या, तुतारी, मांडवी, नेत्रावती, दिवा सावंतवाडी या पॅसेंजर एक्सप्रेस सह उधना, मडगाव नागपूर आणि काही हंगामी गाडयांना थांबा आहे.
दररोज या स्थानकातून मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रवास सुरु असतो. मुळात हे स्थानक खोलगट भागात असल्यामुळे प्रवाशांना वर, खाली ये जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्यांचा वापर करावा लागत असतो. समवेत असलेल्या सामानसह चढ उतार करताना प्रवाशांना खूप अडचणी येतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी तसेच आजारी व्यक्तींना वरखाली येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे राजापूर रोड स्थानकात लिफ्टची सुविधा कोकण रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी मागील अनेक वर्षे पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून लेखी पत्र व्यवहाराद्वारे कोकण रेल्वे प्रशासनाकडे सुरु होती. प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे आणि त्यांचे सहकारी सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले. कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर रोड स्थानकात लिफ्टसाठी ६० लाखाची निविदा अधिकृतपणे जाहीर केली असल्याची माहिती आदिनाथ कपाळे यांनी दिली.