राजापूर : प्रदीर्घ काळानंतर निवडणूक होऊन दोन दिवसांपूर्वी निकाल लागलेल्या राजापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती कोण होणार याचीच मोठी उत्सुकता समस्त राजापूर तालुकावासीयांना लागून राहिली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे राजापूर पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण यापूर्वी जाहीर झाले आहे. याआधीही आठ महिलांनी राजापूरचे सभापतिपद यशस्वीरीत्या भूषवले आहे. आता होणारी नववी महिला सभापती कोण असेल, याचीच मोठी उत्सुकता समस्त राजापूर तालुकावासीयांना लागून राहिली आहे.
राजापूर पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून तत्कालीन ओणी पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रतिभा गुरव यांना बहुमान मिळाला होता. शिवाय रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून प्रतिभा गुरव यांनाच ती संधी लाभली होती. प्रतिभा गुरव यांच्यानंतर सुजाता ठुकरूण, चेतना पारकर, पल्लवी तळेकर तळेकर, सोनम बावकर, विशाखा लाड, प्रमिला कानडे आणि करुणा कदम अशा आठ महिलांना आजवर राजापूर पंचायत समितीचे सभापतिपद भूषवण्याची संधी लाभली आहे.
यंदा पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे यापूर्वीच आरक्षित झाले असून तालुक्यातील ताम्हाणे आणि नाटे अशा दोन गणांचे आरक्षण त्या प्रवर्गामध्ये पडले आहे. त्या दोन प्रवर्गापैकी ताम्हाणे गणातून समीक्षा वाफेलकर आणि नाटे गणातून नंदिनी कदम अशा दोन महिला विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये समीक्षा वाफेलकर या शिवसेनेकडून, तर नंदिनी कदम या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र नंदिनी कदम या मूळ शिवसेनेच्याच आहेत. आता राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद भूषवण्याची संधी या दोन गणातील महिलांना मिळणार का अन्य गणातील निवडून आलेल्या की ज्यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे अशा महिलांना मिळणार त्याबाबत आता राजापूर तालुक्यात चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सभापती पदासह उपसभापती पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
सभापतिपदासमवेत उपसभापती कोण होणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये रायपाटण गणाचे सदस्य उमेश पराडकर आणि केळवली गणाच्या सदस्या भाग्यश्री लाड या उभय सदस्यांना उपसभापती पदाचा अनुभव आहे. मात्र, शिवसेनेच्या वतीने कुणाला संधी मिळते ते महत्त्वाचे ठरणार आहे. आता प्रशासनाकडून सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा घोषित होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.