राजापुरात १४३ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस 
रत्नागिरी

Ratnagiri News : राजापुरात १४३ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची पूर्वतयारी; धोकाग्रस्त भागांची पाहणी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : आगामी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राजापूर महसूल प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. भूक्षलन, जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे तसेच वीज कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोकाग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली असून संभाव्य आपदाग्रस्त १४३ कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तहसीलदार विकास गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील संवेदनशील गावांची माहिती घेण्यात आली. पावसाळ्यात जीवितहानी होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेता यावी यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित कुटुंबांना वेळेत सूचना देऊन आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

गेल्या काही वर्षांत राजापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूक्षलन, दरडी कोसळणे, जमिनीला तडे जाणे, जमीन खचणे आणि वीज कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. काही भागांमध्ये घरांनाही धोका निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगत धोकादायक क्षेत्रांची यादी तयार केली आहे.

तालुक्यातील धोपेश्वर खंडेवाडी, नाडणकरवाडी, गुरववाडी आणि बौद्धवाडी येथील ५० घरांमधील १५ कुटुंबे, वडहस्तळ मोहितेवाडी व हळदीची खांडवाडी येथील २० घरांमधील २१ कुटुंबे, फुफेरे पाटीलवाडी येथील ३ घरांतील ५ कुटुंबे तसेच महाळुंगे येथील ११ घरांमधील १५ कुटुंबे यांचा धोकाग्रस्त यादीत समावेश आहे. अशा १२४ घरांतील १४३ कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

महसूल विभाग, ग्रामपंचायती, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच धोकादायक ठिकाणी राहणाऱ्यांनी वेळेवर सुरक्षित स्थळी स्थलांतर करून स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या जीवितास प्राधान्य द्यावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT