रत्नागिरी : कोकणच्या निसर्ग सौंदर्यात आणि अध्यात्मिक वारशात मानाचे स्थान असलेल्या राजापूर तालुक्यातील 'उन्हाळे गंगातीर्थ' क्षेत्राचा आता खऱ्या अर्थाने कायापालट होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल ९३.८१ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आता गंगातीर्थ परिसराचे सुशोभीकरण आणि विविध नागरी सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत.
राजापूरपासून साडेतीन किलोमीटर अंतरावरील उन्हाळे येथील हे ठिकाण 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. साधारण दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा आणि येथील १४ कुंडांमधील पाण्याचे वेगवेगळे तापमान हे आजही विज्ञानासाठी एक कुतूहल आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रशासकीय तांत्रिक बाबी, ग्रामपंचायत आणि देवस्थान संस्थांमधील समन्वयाचा अभाव यामुळे या परिसराचा विकास काहीसा रखडला होता. आमदार सामंत यांनी या विषयात जातीने लक्ष घालून स्थानिक ग्रामपंचायत आणि देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्यात समन्वय घडवून आणला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा संयुक्त आराखडा तयार करण्यात आला. यामुळे या कामातील सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे दूर झाले.
या मंजूर निधीतून गंगार्तीर्थ परिसरात भाविकांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने विश्रामगृहाची दुरुस्ती, मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण आणि बळकटीकरण, दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावनाचे सौंदर्यीकरण यांचा समावेश आहे. तसेच, परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आणि महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणे या कामांना प्राधान्य दिले जात आहे.