राजापूर : राजापूरची जगप्रसिद्ध गंगामाई सध्या पावसाळ्यातही दिमाखात प्रवाहित झाली असून मूळ गंगेसह गोमुखातून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत आहे. काशीकुंड तुडुंब पाण्याने भरले असून, परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा पहावयास मिळत आहे. त्यामुळे गंगाक्षेत्रात पुन्हा एकदा भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगाक्षेत्राला भेट दिली असता तेथे उपस्थित असलेल्या गंगापुत्रांच्या मतानुसार ८ जुलैला गंगेचे आगमन झाल्याची माहिती मिळाली.
ऐतिहासिक राजापूर तालुक्यातील ठळक वैशिष्ठ्यापैकी एक असलेल्या राजापूरच्या गंगेला मोठा इतिहास आहे. पूर्वी राजापूरची गंगा साधारणपणे दर तीन वर्षांनी प्रकट होण्याची परंपरा होती. गंगेचे आगमन हा राजापूरसह संपूर्ण कोकणासाठी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा मानला जात असे. मात्र, गेल्या १५ ते २० वर्षांत गंगामाईच्या आगमन आणि गमनाच्या पारंपरिक चक्रात लक्षणीय बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यापूर्वी गंगामाई साधारण डिसेंबर ते जून या कालावधीत प्रकट होत असे आणि दोन ते अडीच महिने वास्तव्य केल्यानंतर अंतर्धान पावत असे. असा तिचा मागील अनेक वर्षातील इतिहास राहिला आहे. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी पुन्हा तिचे आगमन होत असे.
मात्र, अलीकडील काळात हा नियम मोडीत निघाल्याचे दिसून येत आहे. गमन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच गंगा पुन्हा प्रकट झाल्याच्या घटनाही घडल्या असून काही वेळा तिचा प्रवाह दीर्घकाळ कायम राहिल्याचे पहायला मिळाले आहे. गंगामाईच्या या बदलत्या प्रवाहामुळे गंगाक्षेत्राचे धार्मिक आणि आर्थिक चित्रही बदलले आहे. पूर्वी तीन वर्षांनी गंगा प्रकट होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक राजापूरमध्ये दाखल होत असत. गंगास्नानासाठी मोठी गर्दी होत असे. संपूर्ण गंगाक्षेत्र भाविकांनी फुलून जात असे. स्थानिक व्यापाऱ्यांसाठी हंगामी बाजारपेठ उभी राहत असे.
पूजा साहित्य, फळे, प्रसाद, खाद्यपदार्थ आणि इतर व्यवसायांना मोठी चालना मिळत असे. राजापूरसह विविध आगारांतून अतिरिक्त एसटी बस सोडाव्या लागत असत. मात्र गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन-गमनाच्या बदललेल्या चक्रामुळे पूर्वीसारखी उत्सुकता आणि नियोजन राहिलेले नाही. गंगा वारंवार प्रकट होत असल्याने भाविकांची गर्दी तुलनेने विखुरली असून गंगाक्षेत्राशी निगडित पारंपरिक अर्थकारणावरही त्याचा परिणाम झाल्याचे स्थानिक व्यापारी आणि नागरिक सांगतात.
दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गंगाक्षेत्रावर भेट दिली असता तेथील चित्र गंगा आगमनाची ग्वाही देणारे असे सुखद होते. मूळ गंगेचा प्रवाह तेजीत सुरु होता. सर्वात महत्वाचे असे काशिकुंड तुडुंब भरले होते. तर गोमुखातून अविरत पाण्याचा प्रवाह सुरु होता. असे चित्र पावसाळी दिवसांत सहसा पहावयास मिळत नाही. गंगेचे आगमन झाल्याची पुष्टी मिळत होती. याबाबत तेथे सेवेसाठी असलेल्या गंगापुत्र यांच्याकडे विचारणा केली असता ८ जुलैला (२०२६) गंगेचे आगमन झाल्याची माहिती मिळाली.