Ratnagiri Rain file photo
रत्नागिरी

Ratnagiri Rain: राजापूरला पुराचा वेढा; घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद

गेले काही दिवस संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

मोहन कारंडे

Ratnagiri Rain

राजापूर : गेले काही दिवस संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने आज पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्स पर्यंत पोहोचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असुन शहरातील बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. तर व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.

कोदवली नदीचे पाणी बाजारपेठेत शिरले

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे. शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजी पथ रस्ता पुर्णत: पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे.

अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद

सकाळी सहा वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. हवामान खात्याने आज कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान अनुस्कुरा घाटात दरड कोसळली असून घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT