Ratnagiri news
राजापूर : शेतात गुरे चारायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील अजिवली येथे शनिवारी सायंकाळी घडली. जयवंत राणे (वय ४९, रा. अजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ महावितरण विरोधात संतप्त झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे हे सायंकाळच्या सुमारास गावातील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास गवतात पडलेल्या महावितरणच्या विद्युत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच अजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी जयवंत यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेनंतर सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु, एवढी मोठी दुर्घटना घडूनही रात्री पावणेदहा वाजेपर्यंत पाचल अथवा राजापूर कार्यालयातील एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही; त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते.
महावितरणच्या या अत्यंत बेजबाबदार व ढिसाळ कारभाराबद्दल उपस्थित ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांच्यासह राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली.
मृत जयवंत राणे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महावितरण किंवा शासनाने ठोस आर्थिक भरपाई जाहीर करावी, अन्यथा शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. अखेर रात्री पावणेदहा वाजता महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, या घडलेल्या दुर्घटनेबद्दल महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.