राजापूर : मागील दोन-तीन वर्षे राजापूर तालुक्यात झालेल्या घरफोड्यांमुळे कायदा सुव्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे आता गावागावांत पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा दले गठीत करून सतर्क राहणे आवश्यक बनले आहे.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले होते. त्याला मोठा लोकसहभाग लाभला होता. राज्यात अनेक गावातील मोठ्या प्रमाणात तंटे मिटविण्यात यश आले होते. योजना यशदायी ठरली होती. अनेक गावे तंटामुक्त होत शासनाच्या बक्षीसाला पात्र ठरली होती.
गावागावातील तंटे मिटून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे समस्त ग्रामस्थ एकदिलाने नांदावेत असा मूळ हेतू त्या अभियानाचा होता. तो साध्य झाला होता. त्या योजनेत ग्रामसुरक्षा दलांना मोठे स्थान होते. गावची सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी गावागावांत ग्रामसुरक्षा दळे स्थापन करणे याला अधिक भर देण्यात आला होता.
त्यानुसार असंख्य गावात स्थापन झालेल्या ग्रामसुरक्षा दळे यांच्या माध्यमातून चांगली कामे पार पडली होती. गावागावांत सतर्कता निर्माण झाली होती. ग्रामसुरक्षा दलांचे सदस्य आपली जबाबदारी चोख बजावत होते. परिणामी, गावागावांत जागरूकता होती. मात्र तंटामुक्तीचा जोर कमी झाला आणि गावागावांत स्थापन केल्या जाणार्या ग्रामसुरक्षा दलानाही खिळ बसली.
गेल्या दोन, तीन वर्षात तालुक्यात घरफोड्यांचे प्रकार वाढू लागल्याने पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा दलांचे महत्त्व अधोरेखित ठरले असून त्यांची आवश्यकता भासू लागली आहे. प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे अत्यावश्यक बाब ठरत आहे. त्यामुळे गावात जागरूकता राहील. शिवाय निर्माण झालेले भीतीचे वातावरणदेखील दूर होईल. आता शासनाच्या वतीने प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे.