Gram Sabha | ग्रामसभांचे जागरण File Photo
रत्नागिरी

Rajapur Aamsabha Update 2026 | राजापूर आठ वर्षांपासून आमसभेच्या प्रतीक्षेत

Rajapur Aamsabha Update 2026 | २०१८ ची आमसभा ठरली होती शेवटची, प्रदीर्घ काळानंतरच्या संभाव्य आमसभेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

आमसभा का महत्त्वाची?

* विकासकामांचा आढावा घेण्याचे व्यासपीठ

* नागरिकांना थेट प्रश्न मांडण्याचा अधिकार

* तालुक्यातील विविध विषयांचा आढावा घेतला जाईल

* प्रदीर्घ काळानंतर जनतेला आमसभेचे लागलेत वेध

* आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पहिलीच आमसभा

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या यावर थेट चर्चा होण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी तालुक्याची आमसभा तब्बल आठ वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे समस्त तालुकावासीयांना आमसभेची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. यापूर्वी १२ एप्रिल २०१८ रोजी झालेली आमसभा ही शेवटची ठरली होती.

त्यानंतर आजतागायत आमसभा आयोजित करण्यात आलेली नाही. यापूर्वी अखेरची आमसभा १२ एप्रिल २०१८ मध्ये झाली तेव्हा मतदारसंघाचे आमदार म्हणून राजन साळवी कार्यरत होते. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.

मात्र त्यानंतर २०२० साली कोविडची महामारी आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण मुद्दा यामुळे त्या निवडणुका लांबणीवर पडल्याने आमसभा होऊ शकली नव्हती.

परिणामी आठ वर्षे राजापूरची आमसभा झाली नव्हती. दरम्याच्या काळात कोविडचे संकट दूर झाले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयाने निकाली काढला आणि जीप सहित पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग देखील मोकळा झाला.

त्यानंतर निवडणुका पार पडल्या नवीन बॉडी अस्तित्वात आली आणि सभापती आणि उपसभापती आपापल्या पदावर विराजमान देखील झाले. आता त्यांचा कार्यकाल सुरू झाला आहे त्यामुळे समस्त तालुकावासीयांना आमसभेचे वेध लागले आहेत.

दरम्यान मधल्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूरमध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले होते. अनेक स्थानिक प्रश्न मांडले गेले आणि या कार्यक्रमाला काही प्रमाणात आमसभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

राजापूर तालुक्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत आमसभा आयोजित करण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर होणाऱ्या संभाव्य आमसभेकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले असून या बैठकीत विकासकामे, रखडलेले प्रकल्प, तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT