रत्नागिरी : मागील दोन दिवस जिल्ह्यात कोसळणार्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली असली, तरी सह्याद्रीच्या पट्ट्यातील दुर्गम भागात सरीवर पाऊस पडत होता. दोन दिवसांच्या पावसात अनेक ठिकाणी नुकसानाच्या घटना घडल्या असून, पाणी भरल्यामुळे काही भागात चिखल जाऊन नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस जोरदार पाऊस पडल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. ग्रामीण भागातील सखल ठिकाणी नदीकिनारी पाणी भरल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे नुकसानीचे प्रकारही घडले आहेत. बुधवारी पहाटेपर्यंत पाऊस पडल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पात्र सकाळी इशारा पातळीच्या वरती वाहत होते. प्रमुख नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली गेली होती. रत्नागिरीतील काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अंजणारी येथील दत्तमंदिर पाण्याखाली गेले होते. बुधवारी मात्र पाणी पातळी कमी झाली होती. यावर्षी प्रथमच चांदेराई पुलापयर्र्ंत पाणी आले होते. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी पुलावर आले नाही. गतवर्षी काजळी नदीचे खोलीकरण करुन गाळ काढल्याने पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत आले नाही. मंगळवारी माखजन बाजारपेठेत गडनदीचे पाणी घुसल्याने व्यापार्यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे संगमेश्वर बाजारपेठेतही पाणी आले होते. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे पाडावेवाडी येथे झाड कोसळल्याने नुकसान झाल्याची घटना घडली होती.
मागील चौवीस तासात जिल्ह्यात 411.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 88.75, खेड 60.42, दापोली 50.71, चिपळूण 83.22, गुहागर 24, संगमेश्वर 54.16, रत्नागिरी 16.44, लांजा 34.20, राजापूर 40.62 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे.