सर्वात कमी पाऊस  Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Rain : जिल्‍ह्यात पावसाचा जोर होतोय कमी

चोवीस तासात २८८ मि.मी. पाऊस; खेड जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीवर

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासात तब्‍बल २८८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामध्ये सर्वाधिक पाऊस मंडणगडात ५१ मि.मी., चिपळूण ४९.९० मि.मी., तर सर्वात कमी लांजा, रत्‍नागिरी तालुक्‍यात पडला आहे. खेड येथील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्‍या वर आहे. शेतकऱ्यांकडून भात, नाचणी लावणीही पूर्ण झाली आहे.

जुलै महिन्‍यात पावसाने जिल्‍ह्याला झोडपून काढल्‍यानंतर ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाचा जोर कमी झाला आहे. एक ते दोन दिवस वगळता पाऊस कमीच पडत आहे, तर तीन तालुक्‍यांत मात्र पाऊस मुसळधार पडत आहे. आतापर्यंत जिल्‍ह्यात ५७.५५ टक्‍के तर सरासरी १ हजार ९३५ मि.मी. पाऊस पडला आहे. तर गतवर्षी १ हजार ७४४ मि.मी. पाऊस पडला होता तर त्‍याची टक्‍केवारी ५१.८५ इतकी होती. एकंदरीत मागील वर्षापेक्षा यंदाच्‍या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. जुलै महिन्‍यात पाऊस जादा पडल्‍यामुळे जून महिन्‍याचा बॅकलॉग भरून काढले आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस-मंडणगड ५१.१० मि.मी., दापोली २४.३० मि.मी., खेड २९.६० मि.मी., गुहागर ३८.२० मि.मी., चिपळूण ४९.९० मि.मी., संगमेश्वर ४०.१० मि.मी., रत्‍नागिरी १८.४० मि.मी.

आजपासून ग्रीन अलर्ट; हलक्‍या पावसाची शक्‍यता

जिल्‍ह्याला ५ व ६ ऑगस्‍ट यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्‍यामुळे काही तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. उर्वरित तालुक्‍यात पाऊस कमीच पडत आहे. दरम्‍यान, ७ ते ९ ऑगस्‍टपर्यंत जिल्‍ह्याला ग्रीन अलर्ट जारी करण्यात आले असून, हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT