रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, दुपारी 3 च्या सुमारास अचानक वादळी वार्यासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र एकच धावपळ झाली. शेतकर्यांकडून भात कापणी सुरू आहे; मात्र पावसामुळे पुन्हा काम थांबवावे लागले. कापलेले भातावर ताडपत्री टाकण्यात आली. काही ठिकाणच्या शेतकर्यांच्या भात पिकांना फटका बसला आहे.
कोकणात चार महिने धो-धो पाऊस बरसला. नद्यांनी इशारा, धोक्याची पातळी ओलांडली होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर हिटमुळे रत्नागिरीकर अक्षरशा वैतागले होते. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. काही दिवसापासून वातावरणात बदल होत असून मागील बुधवारी अवकाळी पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान केले. त्यानंतर दिवाळीत ही परतीच्या पावसाने हजेरी लावली. एकीकडे जिल्ह्यात 70 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून काही प्रमाणात भात कापणीला आला होता. दसर्यानंतर भात कापणीस सुरूवात झाली. काही दिवसानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कित्येक शेतकर्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने भात पिक वाहून गेले, काहींचे पिके भिजल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याचे सध्यातरी रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र आहे. सोमवारी दुपारनंतर वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी, दुकानदार, वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. काही प्रमाणात किरकोळ पत्रे उडाली तर काही झाडांचे नुकसान ही झाल्याचे सांगण्यात आले. परतीच्या पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिना संपत आला, तरी रत्नागिरीसह राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, परतीचा पाऊस अद्याप पूर्णपणे थांबलेला नसून, पुढील 1 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम असणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.