Ratnagiri Rain update 
रत्नागिरी

Ratnagiri Rain update : सावित्री खाडीवरील आंबेत पुलास दोन बार्जची धडक

बांधकाम विभागाचे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील सावित्री खाडीवरील आंबेत पुलाला सोमवारी पहाटे पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या दोन मोठ्या बार्जेसनी धडक दिली. या बार्जेस पुलाच्या खालच्या भागात अडकून पडल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आदेश देत पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बार्जेस हटविल्यानंतर पुलाची तांत्रिक पाहणी करून पुढील वाहतुकीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.

मुसळधार पाऊस, सावित्री नदीला आलेला पूर आणि भरतीचे पाणी यामुळे महाड परिसरातून वाहत आलेल्या दोन बार्जेस पुलाखाली अडकल्या. घटनेनंतर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. प्रशासनाने सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. मुसळधार पाऊस आणि भरतीच्या पाण्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी पत्र देऊन पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT