लांजातील कंपनीवर छापा; खैर तस्करी उघड 
रत्नागिरी

Ratnagiri : लांजातील कंपनीवर छापा; खैर तस्करी उघड

24 टन खैर लाकडासह तस्करीसाठी वापरलेला एक ट्रक जप्त, दोघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत 24 टन खैर लाकडाचे ओंडके आणि तस्करीसाठी वापरला जाणारा एक ट्रक जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 26 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने थेट लांजात येऊन कारवाई केल्याने खैर तस्करीचा दहशतवादाशी संबंध आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एटीएसच्या तपासात लवकरच कारवाईमागील उद्देश स्पष्ट होणार आहे.

एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लांजा येथील देवधे गावातील गट नं. 448, येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात सुमारे 7 लाख 65 हजार रुपये किमतीचे 9 टन खैर लाकडाचे ओंडके आणि 6 लाख रुपये किमतीचा टाटा 1613 मॉडेलचा (एमएच 06 ए क्यू 7551) जुना ट्रक आढळला. याशिवाय, कंपनीच्या आवारात 12 लाख 75 हजार रुपये किमतीचे 15 टन खैर लाकडाचे ओंडकेही बेकायदेशीररित्या साठवलेले आढळले. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303 (2), 317, 3(5), 61 सह भारतीय वन अधिनियम 1927 आणि महाराष्ट्र वन नियमावली अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यादरम्यान घटनास्थळावरून इम्तियाज कमल बरमारे (वय 53, रा. साई समर्थ कॉम्प्लेक्स, ता. लांजा, जिल्हा रत्नागिरी) आणि सुफियान युसूफ नाचण (वय 49, रा. घर नं. 106, मामू हॉटेलजवळ, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT