रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या प्रमोद जठार यांच्या वाढत्या दौऱ्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यात बैठका, कार्यकर्ता मेळावे आणि संघटनात्मक हालचालींना वेग देत त्यांनी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘पुढचा नगराध्यक्ष आणि आमदार भाजपचाच’ अशा घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले असले, तरी या दाव्यांकडे स्थानिक पातळीवर संशयाने पाहिले जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी “शंभर टक्के भाजप होणार नाही, त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री आहेत,” असे स्पष्ट वक्तव्य करत जठार यांच्या दाव्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जठार हे तळागाळात संघटन उभारणीचे प्रयत्न करत असले तरी जिल्ह्यातील अंतिम राजकीय समीकरणांमध्ये सामंत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले थेट संबंध अधिक प्रभावी ठरत आहेत.
महायुतीतील जागावाटप, स्थानिक राजकीय निर्णय आणि संघटनात्मक गणिते ही उच्च पातळीवर ठरत असल्याने जठार यांच्या दौऱ्यांचा अंतिम निर्णय प्रक्रियेवर कितपत परिणाम होईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या दौऱ्यांदरम्यान जठार यांनी आमदार भैया सामंत यांची घेतलेली भेट, तसेच बीएलओंच्या बैठका या त्यांच्या राजकीय सक्रियतेचा भाग असल्या, तरी हे प्रयत्न स्वतःचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. महायुतीत समन्वय राखण्याऐवजी अशा हालचालींमुळे मित्रपक्षांत अस्वस्थता वाढत असल्याचेही बोलले जात आहे. रत्नागिरीत भाजपची स्वतंत्र ताकद उभारण्याचा प्रयत्न म्हणून जठार यांचे दौरे पाहिले जात असले, तरी हे प्रयत्न पक्षाला बळ देणार की महायुतीतील तणाव वाढवणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.