संगमेश्‍वर : सोनवी पुलाजवळ पडलेले खड्डे. 
रत्नागिरी

Ratnagiri News : सोनवी पुलाजवळ चौपदरीकरणाच्या काँक्रिटीकरणाला आतापासूनच खड्डे

वाहनचालकांना अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

माखजन : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर परिसरात अत्यंत संथगतीने सुरू असतानाच आता माभळे येथील सोनवी पुलादरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला आतापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महामार्गाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाची अशी अवस्था झाल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या खड्ड्यांमुळे एकेरी वाहतूक मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर परिसरात चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी कामाचा वेग मंदावलेला असून वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सोनवी पुलादरम्यान माभळे येथे चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला अल्पावधीतच खड्डे पडू लागल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सोनवी पुलादरम्यान सध्या एका मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची, तसेच समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता आहे. विशेषतः एकेरी मार्गावर वाहनांची वर्दळ असताना खड्डे चुकवण्यासाठी अचानक वाहन वळवावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे.

सोनवी पुलावरून मुंबईच्या दिशेने जाताना पुलाच्या एका बाजूला रस्त्याची उंच-सखल आणि अडथळ्यासारखी रचना वाहनचालकांना जाणवत आहे. चारचाकी वाहनचालकांना या भागातून जाताना मोठे खड्डे असल्याचा भास होत असून वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व जोडरस्त्यांची रचना योग्य पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

चौपदरीकरणासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला इतक्या लवकर खड्डे पडत असतील तर कामाच्या गुणवत्तेची तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेने या ठिकाणाची पाहणी करून खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच काँक्रिटीकरणाच्या दर्जाची तपासणी करून महामार्गाचे काम सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT