Ratnagiri crime news
राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. अणुस्कुरा चेक पोस्ट येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्राने धडक कारवाई करत वाहनासह गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे ९५ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. ही दारु सुमारे ६३ हजार ६५० रुपये किमतीची असल्याची माहिती रायपाटण पोलिसांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
राजापूर तालुक्यात पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू विरोधात धडक मोहीम राबविली आहे. याआधी राजापूर एसटी आगारासमोर पोलिसांनी लाखो रुपयांची गोवा बनवटीची दारू पकडली होतो.त्यानंतर आता अणुस्कुरा घाटात रायपाटण पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहनासह पकडली आहे.
राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अणुस्कुरा चेकपोस्ट येते. येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना अचानक टाटा कंपनीची टाटा इंट्रा (एम एच ०७, ए. जे. ३७३९) गाडी आली. यावेळी तेथे उपस्थित असलेले ए. एस. आय. कमलाकर पाटील, पोलिस शिपाई बळीप आणि पाटील यांनी नाकाबंदी करत सदर गाडी थांबविली आणि तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी ६३,६५० रुपये किमतीची दारु आणि सुमारे तीन लाख किमतीचे वाहनदेखील ताब्यात घेतले. एकूण ३ लाख ६३ हजार ६५० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.