खेड : पुढारी वृत्तसेवा - पोलिस असल्याची बतावणी करून एकाकडून २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ४ जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तालुक्यातील बोरघर- ब्राह्मणवाडी येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी घडला.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हुसेन नाडकर (रा. डाकबंगला, खेड), फाईक कावलेकर, सलीम उमर चौगुले (रा. महाड नाका) व अन्य एकजण असे चार जण दि.१६ ऑक्टोबरला सायंकाळी बोरघर-ब्राह्मणवाडी येथे अविनाश नारायण चव्हाण (५३, रा. ब्राह्मणवाडी, बोरघर) यांच्या घरी गेले. तेथे चव्हाण यांच्या घरी अनधिकृतपणे प्रवेश करून आपण पोलिस असल्याची बतावणी त्यांनी केली. चव्हाण यांना घाबरवून त्यांच्या घराची अनधिकृतपणे त्यांनी झडती घेतली. चव्हाण यांच्या घरातील रिकाम्या कॅनमध्ये या चौघांनी त्यांच्याकडील ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू टाकली. तसेच त्यांच्यावर अवैध दारू व्यवसायाची कारवाई करतो, अशी दमदाटी करून हे प्रकरण मिटवण्यासाठी चव्हाण यांच्याकडून २५ हजार पोलिस असल्याची बतावणी करत २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी रुपयांची मागणी केली. यामुळे घाबरलेल्या चव्हाण यांच्याकडून १० हजार रुपये घेऊन ते निघून गेले तसेच उर्वरित रक्कम अब्दुल्ला नाडकर यांच्या खेड येथील ऑफिसमध्ये जमा करावी, असे सांगण्यात आले होते. याबाबत चव्हाण यांनी खेड पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दखल केला असून अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.