कवी केशवसुत स्मारक मालगुंड आता पुस्तकांचे गाव File Photo
रत्नागिरी

कवी केशवसुत स्मारक मालगुंड आता पुस्तकांचे गाव

साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम १० लाख : उदय सामंत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठ 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही, असेही सांगितले.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पुस्तकांचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच श्वेता खेऊर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषा विभाग हे खातं मी मागून घेतलं आहे. कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषेचा मंत्री झाल्यावर माझ्या हातून मंगेश पाडगावकरांच्या गावी कवितेचे दालन पुस्तकांचे गाव, कुसमाग्रजांच्या शिरवाडे गाव पुस्तकांचे गाव सुरु करण्याचे नियतीच्या मनात असावे. साहित्यिकांचा पुरस्कार सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे दोन दिवस घेतला. विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेतले. पहिला साहित्य भूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना देण्याचे भाग्य लाभले.

ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचवेळेला मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिध्द झालेले आहे. एकनाथांनी अभंग लिहिले त्याचवेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिध्द झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला, त्याचवेळेला मराठी भाषा अभिजात झालेली होती, असे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. कवी केशवसुत, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक यांचा आदराने उल्लेख लंडनमध्ये झाला होता. कोकणाने राज्याला दिलेले साहित्यिक पाहता कोकण साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. हे साहित्य आपण सर्वांनी पोहचविले पाहिजे.

यापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटींची तरतूद केलेली आहे, असे सांगून डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेत ताकद आहे. मराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहे. जोपर्यंत साहित्यिक नाटक लिहीत नाही तोपर्यंत नाटक रंगमंचावर येत नाही.

अनेकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. जे काही संगीत निर्माण होतं, गाणी निर्माण होतात, जे काही नाटके निर्माण होतात, जे काही चित्रपट निर्माण होतात, जर साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया हा आपल्या महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत. कवी केशवसुत स्मारक हे माझ्या मतदार संघात आणि तुमच्या मालगुंड गावामध्ये आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपण ठेवावा, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात पद्मश्री श्री. कर्णिक म्हणाले, कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. एका हातात भाकरी असेल तर ती भाकरी आपल्याला जगवेल. दुसऱ्या हातात पुस्तक असेल तर का जगावं हे ते पुस्तक सांगेल. संचालक डॉ. देवरे यांनी पुस्तकांच्या गाव या मागील शासनाची भूमिका सांगितली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अरुण म्हात्रे यांनी शिपाई कविता सादर केली. विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी स्वागत प्रास्तविक केले. आनंद शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. मालगुंड ग्रामपंचायतीत प्रथम पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास जयु भाटकर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, सुनिल मयेकर, नलिनी खेर आदींसह साहित्यिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT