चिपळूण : एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामासाठी शहरात विविध ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. न.प. च्या परवानगीने हे काम सुरू असले तरी आवश्यक ते सुरक्षेचे उपाय न केल्याने मार्कडी प्रभात रोड येथे नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खड्डे खोदाईमध्ये फुटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागून पाणीपुरवठा ठप्प झाला.
चिपळूण न. प.चा पाणीपुरवठा विभाग अभियंता व सक्षम अधिकाऱ्यांविना कमकुवत झाला आहे. या विभागात असलेल्या अभियंत्यांची बदली झाल्यामुळे पाणीपुरवठा विभागात येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्याचे काम प्रशासनाला ठेकेदारावर अवलंबून राहात करावे लागत आहे. त्यातच सक्षम अधिकाऱ्यांची वानवा आणि ठेकेदारीवर नेमलेले कर्मचारी यामुळे पाणीपुरवठ्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी व वारंवार व्यत्यय दूर करण्यास न.प.ची दमछाक होत आहे. सद्यस्थितीत हा विभाग ठेकेदारीवर पूर्णतः अवलंबून आहे. शहराला १५५ कोटी रुपये खर्चाची ग्रॅव्हिटीने पाणी योजना मंजूर झाली असून, प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, दुसरीकडे सक्षम अधिकारी व अभियंत्यांची उपलब्धता नाही. अशा अडचणी असताना गेले काही महिने शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात न.प. च्या परवानगीने एका खासगी कंपनीकडून खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी खड्डे खोदले जातात अशा ठिकाणी पाणीपुरवठ्याचे पाईप आहे की नाही याची कोणतीही खातरजमा वा नकाशा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे संबंधित कंपनीकडून सोयीस्कररित्या खड्डे काढण्याचे काम सुरू आहे. मार्कडी प्रभात रोड येथे पाणीपुरवठा पाईपलाईनला खड्डे खोदण्यामुळे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली.परिणामी,परिसरातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गोवळकोट परिसरातील वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तेथील पाणीपुरवठा ठप्प झाला तर पुन्हा एकदा दोन दिवसांनी मार्कडीसह महामार्गावर पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली तसेच खेर्डी माळेवाडी येथील पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. एकूणच पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांविना कमकुवत झाला आहे. ऐन दीपावली सणात शहरामध्ये पाण्याची चणचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात पावसाळ्यापूर्वी खासगी कंपनीकडून गॅस पुरवठा करण्यासाठी रस्त्यावर चर मारण्यात आले. न.प.ने संबंधित कंपनीकडून रस्त्याच्या नुकसान व सुस्थितीकरिता ७५ लाख रुपये रक्कम भरून घेतली होती. त्यानंतर परवानगी देण्यात आली. आता नव्याने पुन्हा खासगी कंपनीकडून रस्त्यात खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. न.प.ने वरील कंपनीप्रमाणेच या कंपनीकडून देखील खड्डे सुस्थितीत करून रस्ता सुस्थितीत करण्यासाठी रक्कम भरून घेतल्याचे समजते. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे झालेले नुकसान व त्याची दुरुस्ती ही संबंधित कंपनीकडून वसूल करणार की नगर परिषद स्वखचनि करणार याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे.