चिपळूण शहर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणनजीक परशुराम घाटात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12.15 वा.च्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत. रोहित संतोष भालेकर (वय 28, रा. इंदिरानगर, नाशिक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबतच्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (28, रा. कांची, ता. नाशिक) हा मित्रांसह कारने (एम.एच. 15 जेएच 0516) गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने कार भरधाव वेगात चालवल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली. या भीषण अपघातात कारमधील रोहित संतोष भालेकर याचा मृत्यू झाला, तर कृष्णा संपत आव्हाड (33, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (36, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपचारांसाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र चिपळूण येथील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक ईर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल खोंदल व नटे यांनी तत्परतेने मदत कार्य केले. या अपघातात संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.