रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
देवरूखहून विवाह सोहळा आटोपून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या तरुणाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास चंद्रकांत कांबळे (रा. हातखंबा बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून विकास हा कोमामध्ये होता.
मुंबईतील कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. हातखंबा येथील तिघे तरुण दुचाकीवरून देवरूख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते दुचाकीवरून परतत असताना पांगरी येथील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशिराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर विकास चंद्रकांत कांबळे हा गंभीर जखमी झाला होता.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते.
प्रकृती अत्यंतवस्थ असल्याने त्याच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, अपघातानंतर तो कोमात होता. उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवले. ठाणेनंतर कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांसह त्याच्या कुटुंबीयांची सारी धडपड व्यर्थ ठरली आहे.
विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अक्षरशः शर्थीचे प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक दिवस आशेवर काढणाऱ्या कुटुंबीयांना अखेर १२ सप्टेंबर रोजी सकाळी आलेल्या या दुर्दैवी वार्तेने मोठा धक्का बसला.
विकास कांबळे याची ओळख केवळ मित्रपरिवारापुरती मर्यादित नव्हती. तो एक उत्तम नृत्यकलाकार म्हणूनही परिचित होता. विशेषतः लहान मुलांशी सहज संवाद साधत, त्यांच्या भाषेत गप्पा-गोष्टी करत त्यांना नृत्याची गोडी लावणे आणि स्पर्धांसाठी तयार करणे, ही त्याची वेगळीच शैली होती. लहान मुलांना नृत्य शिकवताना तो केवळ त्यांना स्टेप्स शिकवत नसे, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा. एक चांगला कलाकारा गेल्याची भावना हातखंबा परिसरात व्यक्त केली जात आहे.
पांगरीच्या त्या धोकादायक वळणावर घडलेल्या एका अपघाताने तीन तरुणांचे आयुष्य हिरावून घेतले. दोन विकास आणि एक सुमित असे तीन तरुण चेहरे आता केवळ आठवणींत उरले आहेत. अवघ्या तरुण वयात तिघांनीही जगाचा निरोप घेतल्याने हातखंबा बौद्धवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहा महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या विकासच्या जाण्याने या अपघाताची वेदना पुन्हा एकदा ताजी झाली आहे. या संपूर्ण दुर्घटनेने तीन कुटुंबांची आयुष्यभराची न भरून येणारी हानी झाली.