रत्नागिरी : शहरालगतच्या मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनारी अवैधरित्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून महसूल यंत्रणेने याकडे डोळे झाकल्याचे चित्र आहे. किनार्यावरील पांढरी वाळू बिनबोभाटपणे डंपर, पीकअपमध्ये भरून वाहून नेली जात आहे. रात्री बरोबरच भरदिवसाही ओहटीच्यावेळी थेट किनार्यावर गाड्या लावून ही वाळूची लूट चालू आहे.
रत्नागिरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पांढर्या वाळूच्या गटांचा लिलाव झालेला नाही. साखरतर खाडीमध्ये काही वर्षांपूर्वी पांढर्या वाळूसाठी हातपाटीचा लिलाव होत असे. मात्र आरेवारे, पांढरा समुद्रकिनार्यावर बिनदिक्कतपणे वाळू काढून नेली जात असल्याने हे लिलावही घेतले जात नसल्याचे चित्र आहे. पूर्वी साखरतर-काळबादेवी भागातून वाळू उपसा करून होडीने पंधरामाड मुरुरवाडा परिसरात आणली जात असे.
मात्र आता थेट पांढरा समुद्रकिनार्यावरतीच वाळूवर मोफतचा डल्ला मारला जात आहे. अगदी सरकारी कामामध्येही राजरोसपणे पांढरी वाळू वापरली जात आहे. ठेकेदार बिलांमध्ये मात्र काळ्या वाळूचा दर लावत आहेत. अगदी सरकारी कार्यालयाच्या आवारात पांढरी वाळू वापरली जात असली तरी तिच्याकडे अधिकारी वर्ग ढुंकूनही पहात नसल्याचे दिसून आले आहे.
पांढरी वाळू काळ्या वाळूच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने तिचा वापरही वाढला आहे. पांढर्या समुद्रावर थेट किनार्यावरच डंपर, पीकअप गाड्या नेऊन थेट वाळू भरली जात आहे. भर दिवसा वाळू गाड्यांमध्ये भरली जात असली तरी त्याकडे महसूल प्रशासनाने कानाडोळा केल्याचेच चित्र आहे.