राजापूर : नियमित एसटी बस अचानक रद्द करून तिच्या ऐवजी उशिरा येणारी पर्यायी बस सुरू करण्यात आल्याने ओझर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या निषेधार्थ संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी राजापूरकडे जाणारी बस अडवून जोरदार आंदोलन केले. “आमची पूर्वीची नियमित बस तत्काळ सुरू करा,” अशी विद्यार्थ्यांची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
ओझर परिसरातून दररोज सुमारे २५ विद्यार्थी ओणी व राजापूरकडे शिक्षणासाठी प्रवास करतात. त्यांच्यासाठी राजापूर आगारातून सकाळी सहा वाजता निघणारी ओझर फेरीची बस उपयुक्त ठरत होती. विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यासाठी हीच बस आधार बनली होती. मात्र आगाराच्या अचानक निर्णयामुळे ही गाडी बंद करण्यात आली आणि तिच्या ऐवजी येरडव-राजापूर बसची ‘व्हाया ओझर’ अशी फेरी देण्यात आली.
परंतु ही बस सकाळी आठ वाजल्यानंतरच ओझरमध्ये पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या उशिराने विद्यालयात जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे सतत शैक्षणिक नुकसान होत असल्याची विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केली.
या संदर्भात ओणी ग्रामपंचायत तसेच नूतन विद्या मंदिर संस्थेकडूनही राजापूर आगाराला वारंवार पत्रव्यवहार करून तातडीने पूर्वीच्या वेळेत बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आगार प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थ्यांचा संताप उसळला.
बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी विद्यार्थ्यांनी ओझरमध्ये आलेली एसटी बस अडवली व काही काळ ठिय्या देऊन आंदोलन केले. सर्वच पासधारक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आगाराकडून फक्त “कर्मचाऱ्यांना सूचना करू” एवढेच उत्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांची नाराजी अधिक वाढली.
राजापूर आगारातील गेल्या काही महिन्यांतील अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. वेळेत गाड्या न सुटणे, अचानक फेऱ्या रद्द करणे, पर्यायी गाड्या उशिरा धावणे या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. आता या अव्यवस्थेचा फटका शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे, हे बुधवारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून पुन्हा अधोरेखित झाले.