रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्याला सलग तीन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दिवसा पावसाची विश्रांती आणि मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत आहे. चोवीस तासात जिल्ह्यात ३४८.८६ मि.मी. पाऊस पडला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला २२ जुलै रोजी ऑरेंज, तर २३ व २४ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सर्वाधिक पाऊस चिपळूण, खेड, तर सर्वात कमी रत्नागिरी शहर, तालुक्यात पडला आहे. खेडची जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीवर आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास नद्या ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
भात लावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. मंगळवारी दिवसभर कधी उन्ह, तर कधी पाऊस सुरू होता. मात्र, रत्नागिरी शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात मंडणगडात ४७.५० मि.मी., दापोली ३६.३५ मि.मी., खेड ६५.७१ मि.मी., गुहागर ३७.०० मि.मी., चिपळूण ८२.६६ मि.मी., संगमेश्वर ३५.८३ मि.मी., रत्नागिरी ७.११मि.मी., लांजा २७.८०, राजापूर ९ मि.मी. अशाप्रकारे जिल्ह्यात ३४८.८६ मि.मी., तर सरासरी ३८.७७ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.