रत्नागिरी : मराठी साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावे, हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलेला होता; पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही मला माहीत नाही. अनुवाद अकादमी तयार करून त्याची अंमलबजावणी या अकादमीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय विश्व मराठी साहित्य संमेलनात घेणार आहोत. ज्या लेखकाला त्याचे साहित्य मराठीतून हिंदीत करायचे असेल, मराठीतून कन्नडमध्ये करायचे असेल, मराठीतून तमिळमध्ये करायचे असेल तर त्यालाही निधी द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. परदेशातील मराठी मुलांना मराठी भाषेचे ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम पुढील वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मधुभाई साहित्य, समाज कृतज्ञता सोहळ्यानिमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व प्रकट मुलाखत कार्यक्रम शनिवारी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जयू भाटकर, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांच्याहस्ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सामंत पुढे म्हणाले की, मराठी भाषा पुढे नेण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते मंत्री या नात्याने करायला नक्की तयार आहे. मी मंत्री झाल्यापासून 27 फेब्रुवारीचा कार्यक्रम आता गेट वे ऑफ इंडियाला करतो. ज्यावेळी आपण मोठ्या मंचावर करतो, त्यावेळी त्याची कुठेतरी चर्चा होते आणि त्याच्यातून अजून तरुण साहित्यिक निर्माण व्हावेत ही या कार्यक्रमा मागील भावना आहे. मराठी भाषा विभागाला वित्त मंत्री अजितदादांनी 265 कोटी रुपये दिले. त्यामधून सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन असेल, युवा साहित्य संमेलन असेल, दिल्लीचे आमचे मराठी साहित्य संमेलन असेल, परवा झालेलं साताऱ्याचं मराठी साहित्य संमेलन असेल. आज मराठी भाषेचं दालन महाराष्ट्राच्या कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये उभारण्याची ताकद आज मराठी भाषा विभागाची झालेली आहे. रत्नागिरीमध्ये अशी एक नगरपालिकेची शाळा आहे की ज्याचा आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतला पाहिजे. त्याचं नाव दामले विद्यालय आहे. विद्यालयाच्या पहिल्या वर्गामध्ये वेटिंग 100 मुलांचं असतं. पहिली ते दहावी मध्ये आता पंधराशे विद्यार्थी शिकतात.
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जयू भाटकर यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कोकण विभागातील साहित्यिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.