रामआळी, मारुतीआळीत फेरीवाल्यांना ‘नो एन्ट्री’ 
रत्नागिरी

Ratnagiri News : रामआळी, मारुतीआळीत फेरीवाल्यांना ‘नो एन्ट्री’

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा ठाम नकार; शहरात १२ ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामआळी आणि मारुतीआळी येथील फेरीवाले, पथविक्रेत्यांना व्यवसाय करू देण्यास नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ठाम नकार दिला. त्यामुळे याठिकाणच्या फेरीवाल्यांसह पथविक्रेत्यांना आठवडाबाजार येथे व्यवसायासाठी जाणे भाग पडले. याठिकाणी पथविक्रेते आणि फेरीवाल्यांना जागा आखून देण्यात आल्या आहेत. फेरीवाले आणि पथविक्रेत्यांसाठी शहरात १२ जागा निश्चित करण्यात आल्या असल्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

रामआळी आणि मारूतीआळी याठिकाणचे रस्ते फारच अरुंद आहेत. विविध सण-उत्सवांच्या दिवशी पथविक्रेते आणि फेरीवाल्यांमुळे वाहनांसाठी वाहतूक बंद राहते. त्याचबरोबर ग्राहकांचीसुद्धा फारच अडचण होते. स्मार्टसिटी अंतर्गत फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना हॉकर्स झोन निश्चित केले जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले होते. त्यानुसार विक्री क्षेत्राची यादी जाहीर करण्यात आली. या नियोजनामुळे रहदारीच्या रस्त्यावर होणारी गर्दी आटोक्यात येणार असून फेरीवाले आणि पथविक्रेत्यांनाही त्यांच्या वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध होणार आहे.

सोमवारी सकाळीच मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम, आनंद थोरात, जितेश पोवार यांनी मारूतीआळी आणि रामआळीतील फेरीवाले पथविक्रेत्यांना आठवडाबाजार येथे निश्चित केलेल्या जागेच्या ठिकाणी जाण्यास सांगितले. या सर्व व्यावसायिकांनी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची भेट घेवून दिवाळी सणासाठी त्याठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी देण्यास विनंती केली. परंतु नगराध्यक्षांनी ठामपणे नकार देवून हॉकर्स झोन किंवा विक्री क्षेत्राच्या ठिकाणीच व्यवसाय करण्यास सांगितले. त्यानुसार रामआळी आणि आठवडाबाजार येथील फेरीवाले पथविक्रेत्यांना शनिवार आठवडाबाजार येथे जागा आखून देण्यात आल्या.

हॉकर्स झोनच्या यादीनुसार साळवी स्टॉप ते शिवाजीनगर पर्यंतच्या सर्व फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना साळवी स्टॉप येथीलच जलतरण तलावाजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या पूर्वेकडील जागा या परिसरातील विक्रेत्यांना देण्यात आली.

स्व.प्रमोद महाजन मैदानाच्या बाजूची जागा खादी ग्रामोद्योग शेजारील जागा आणि गाडीतळ पोस्टाजवळची सर्व जागा विक्रेत्यांना मिळणार आहे. धनजीनाका, मासळी मार्केट येथील विक्रेत्यांना नगरपरिषद शाळा क्र.१४ चे मैदान उपलब्ध आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून निवखोलकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुग्णालयाच्या बाहेरील सर्व स्टॉलना जागा निश्चित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT