दापोली : जिहादी आणि दहशतवादी यांचा रंग हिरवाच आहे, असे विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली येथे केले. शुक्रवारी 25 रोजी पाजपंढरी येथे आयोजित धर्मसभेसाठी नितेश राणे हे दापोली येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
जे जिहाद करत आहेत ते सर्व हिरव्या रंगाचे आहेत, आम्ही फक्त भाईचारा करत आहोत. जिहादींनी गोळ्या झाडण्याआधी धर्म विचारला, कपाळावरील सिंदूर काढायला सांगितले, कलमा पडायला सांगितला आणि नंतरच गोळ्या झाडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवतील, असे ते म्हणाले.
अडखळ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत काही लोकांची नावे एफआयआरमध्ये आली नाहीत. अशा लोकांना कोणीही वाचविण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आमच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत. गृहखात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवा आणि आपली खुर्ची सांभाळा, असा इशारा राणे यांनी नेमका कुणाला दिला याची चर्चा दापोलीत होत आहे.
हर्णे बंदरात जेटीचे काम सुरू आहे. या जेटीमुळे येथील मच्छीमार बांधवांच्या नौका सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे या जेटीचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश मंत्री राणे यांनी ठेकेदारांना दिले आहेत.