चिपळूण शहर : चिपळुणातील वाशिष्ठी नदीच्या खाडीमुखावरील गाळ काढण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क करून मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारित या भागातील गाळ काढण्याकरिता सहकार्याच्या विनंतीला ना. राणे यांनी तातडीने प्रतिसाद देत लगेच प्रस्ताव पाठवा, गाळ काढण्यास मेरीटाईम बोर्डाकडून मंजुरी मिळेल, असे स्पष्ट केल्याने आता चिपळूमधील गाळ काढण्याच्या विषयात ना. राणे यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे.
पालकमंत्री उदय सामंत शनिवारी चिपळुणात विविध कार्यक्रमांसाठी आले असताना वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढण्यासंदर्भात अधिकार्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली. बैठकीदरम्यान नद्यांमधील गाळाबरोबरच गोवळकोट खाडी अर्थात दाभोळ खाडीत गोवळकोट येथे वाशिष्ठी नदी ज्या ठिकाणी मिळते त्या मुखावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मात्र, हा गाळ काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी आवश्यक असल्याचे संबंधित अधिकार्यांकडून ना. सामंत यांच्या निदर्शनास आणले.
ही बाब निदर्शनास येताच सामंत यांनी तातडीने मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून चिपळुणातील बैठकीसंदर्भात माहिती देऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणली. त्यावर ना. राणे यांनी, तातडीने प्रस्ताव पाठवून द्या. मेरीटाईम बोर्डाकडून परवानगीसह आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे पालकमंत्री सामंत यांच्या विनंतीला मान देऊन बंदर विकास मंत्री राणे यांनीदेखील चिपळूणच्या गाळप्रश्नी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. बैठकीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी नद्यांमधील गाळाबरोबरच कामथे, कापसाळ फणसवाडी व अन्य धरणातील गाळ काढणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर ना. सामंत यांनी हेही काम निश्चित केले जाईल. त्यासाठी पुढील महिन्यात जलसंधारण मंत्र्यांचा चिपळुणात दौरा आयोजित करून त्याचे पूर्ण नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान पालकमंत्री सामंत यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून चिपळुणातील विविध प्रश्नी बैठक सुरू असल्याचे सांगून याबाबत घेतल्या जाणार्या निर्णयाची माहिती दिली. यावर उपमुख्यमंत्र्यांकडून देखील चिपळूणसाठी जे आवश्यक असेल ते करा. आपले सहकार्य राहील अशी सूचना केल्याची माहिती सामंत यांनी देऊन दोन्ही नद्या गाळमुक्त झाल्यानंतर ड्रोन सर्व्हेच्या माध्यमातून चिपळूण शहराची लाल व निळी पूररेषा कमी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारण लाल व निळी रेषा ही समस्या केवळ चिपळूणपुरती नसून राज्यातील 17 शहरांसाठी शासनाच्या जलसंधारण विभागाने पूररेषेपासून सुरक्षित केलेले नियोजन आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील गाळ काढल्यामुळे पुराची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आल्यावर ड्रोन सर्व्हेतून ही रेषा कमी होऊ शकते, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार प्रथम पूरमुक्त शहर करून रेषा कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.