रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत आज श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सह-संघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस माधवी नाईक, सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस विजय चौधरी तसेच राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री म्हणून पक्षाच्या मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण अवघ्या 15 दिवसांत हटवले. त्यांची धडक कारवाई अद्यापही चर्चेत आहे.