चिपळूण शहर : देशाला राष्ट्रपती नावापासून पिन कोड सुचविणारे कोकणातील दिग्गज विद्वान आहेत हे आपल्याला पहिल्यांदाच वाचनालयाच्या कला दालनातून समजले. कोकणातील विद्वानांचा हा इतिहास आज सगळ्यांना समजणे गरजेचे आहे. यासाठी वाचनालयाने राबविलेला उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून वाचनालयाला सर्वतोपरी मदत व सहकार्य करून वाचनालयाचाच एक भाग मी होणार आहे, अशा भावना आमदार नीलेश राणे यांनी वाचनालयाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात व्यक्त केल्या.
आमदार नीलेश राणे आज (दि. 8) चिपळूण दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे शिवसेना गटाचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकार्यांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर पाग बौद्धवाडी परिसरातील समस्यांची माहिती घेतली. तसेच तसेच राधाकृष्ण नगरमधील मुत्तपन मंदिरात दर्शन करून मंदिराच्यावतीने सत्कार स्वीकारला. चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर (लोटिस्मा) वाचनालयाच्या वस्तू संग्रहालय व कला दालनाची पाहणी केली. यावेळी वाचनालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाचनालयाचे आधारस्तंभ प्रकाश देशपांडे यांनी पौराणिक वस्तू संग्रहालयासहीत कला दालनाची माहिती देऊन वाचनालय भविष्यात विविध सामाजिक व सांस्कृतीक उपक्रम राबविण्याच्या तयारीत आहे. मात्र, आवश्यक जागा व आर्थिक सहकार्य मिळावे याकरिता प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपण मदत कराल, अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना आ. राणे म्हणाले की, वाचनालयाने उभारलेले पुरातन वस्तू संग्रहालय अप्रतिम आहेच, त्याचबरोबर कला दालनात लावण्यात आलेली तैलचित्रे पाहून कोकणच्या भूमीत देशाला राष्ट्रपती नावासहीत पिन कोड नंबर सुचविणारे दिग्गज विद्वान जन्माला आले आहेत ही माहिती ऐकून आपण थक्क झालो आहोत. या बाबत आपण देखील अनभिज्ञ होतो. मात्र, वाचनालयाच्या कलादालनातून ही माहिती व ज्ञान आपल्याला मिळाले. असेच ज्ञान व माहिती इतरांना व्हावी यासाठी वाचनालयाच्या उपक्रमाला आपण सर्व सहकार्य करू. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनादेखील या उपक्रमाला सहकार्य करण्याबाबत आपण आग्रह करणार आहे. त्यांनादेखील येथील पुरातन वस्तूसंग्रहालय व कलादालन पाहण्यास आवर्जून भेट द्यावी असा त्यांच्याकडे हट्टच धरणार आहे.
एकूणच वाचनालयाच्या उपक्रमाला ज्या-ज्यावेळी सहकार्य व मदत लागेल त्यावेळी आपण योगदान देऊ. यावेळी विनोदी शैलीत त्यांनी, भविष्यात माझाही कलादालनातील तैलचित्रात समावेश होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, असे सांगितले.