रत्नागिरी : पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिला एकत्र जमून एकमेकींची सुखदु:ख जाणून घ्यायचे. हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली पण हळदी-कुंकवाची प्रथा आजही सुरू आहे. मात्र, या पारंपरिक उत्साही सणामध्ये नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे वाण वाटण्यासाठी चढाओढ पहायला मिळते. यातून आपण किती श्रीमंत आहोत, हे दाखवले जात आहे. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात पारंपरिक पध्दतीनेच हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार सण सिलेक्टिव्ह वाण देण्याची नवीन ट्रेंड समाजात पहायला मिळत आहे.
हळदी कूंकू हे सौभाग्याचे लेणं मानले जाते. मकर संक्रांतीत हळदी कुुंकू करुन सुगड पूजन केले. मकर संक्रांत सण महिनाभर असतो मार्गशीर्ष संपला की, 14 जानेवारीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत हा सण सुरु असतो. या अलीकडच्या काळात महिनाभर वाण लुटण्याचा ट्रेंड बघावयास मिळतो. मुळात मकर संक्रांत सण का साजरा केला जात होता. आता त्याला चढाओढ, स्पर्धा, दिखावपणाची गरज का भासली याचा प्रत्येकांनी विचार केला पाहिजे. आपल्या शेजारी महिलेने 100 रुपयाची वस्तू वाण म्हणून दिली तर आपण त्यापेक्षा महागडी वस्तू दिली पाहिजे म्हणून महिला नाहक खर्च करतात. केवळ आपण इतरांपेक्षा जास्त खर्च कसा केला इथपासून महागडी साडीपासून ते वाणपर्यंत हजारों रुपये खर्च करण्याची जणु स्पर्धा सुरु झाली आहे. या कार्यक्रमातून चांगल्या चर्चा कमी आणि माप काढण्याची चर्चाही जास्त होते अशा रिल्ससुध्दा सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत.
सुवासिनींना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वाण म्हणून पान सुपारी, बांगड्या व अन्य सौभाग्याचे लेणं म्हणून दिले जाते. हल्ली या वस्तू आउट डेटेड झालेल्या आहेत. वाण देण्याचे स्वरुप बदलत चालले आहे. हल्ली फ्लॅट संस्कृती वाढली. त्यामुळे घरोघरी जाउन वाण घेण्याची परंपराही तशी मागेच पडत चालली आहे. त्यामुळे मोजक्याच महिलांना घरी बोलावून त्यांना एखादी चांगली वस्तू वाणात दिली जाते. काही दिवसांपूर्वी संक्रांतीचे वाण लुटण्याठी प्लास्टिकच्या वस्तूंना मागणी होती. आता हा ट्रेंड बदलत आहे. वाण देण्यावरुन चढाओढ दिसते. प्लास्टीक, स्टीलच्या भांड्यापासून ते चांदीचा करंडापर्यंत महागडे वस्तू वाण म्हणून दिले जाते यातला हळदीकुंकूचा खरा मतितार्थ लोप पावत आहे.
15-20 वर्षांपूर्वींपर्यंत एकमेकांना भेटण्यासाठी, स्नेह वृध्दींगत करण्यासाठी म्हणून महिला एकत्र येवून संक्रांतींचे हळदीकुंकू साजरा करत होत्या. आताही काही ठिकाणी खर्या अर्थाने हळदीकुंकू साजरा केला जातो तर बर्याच ठिकाणी केवळ चढाओढीसाठी हा सण साजरा केला जात असल्याचे समाजमाध्यमांवर पहावयास मिळते.? ? अमुक एकीने हे वाण दिले तमुक एकीने केवळ काहीच दिले नाही अशा पध्दतीने काही ठिकाणी मापही काढली जातात. हा सण मुळात का साजरा केला जातो याचा विसर पडत जात आहे. कोणत्याही सणामधून आनंद मिळवता आला पाहिजे मात्र या सणामधून काही लोक आपल्या परिस्थितीचा शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भारतीय संस्कृतीत काही सण उत्सव हे कौटुंबिक ऋणानुबंध जपण्यासाठी, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येण्यासाठी केले जाते. आता सणासुदीला काही लोक सिलेक्टीव्ह लोकांना बोलावतात. पूर्वी हळदकुंकूमध्ये वर्ग भेदभाव दिसून येत नव्हता अलीकडे तो प्रकर्षाने दिसून येतो.
राजकीय लोक आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी अलीकडे हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम सगळीकडे घेत असतात. हा ट्रेंड महाराष्ट्रात सगळीकडे पहावयास मिळतो. राजकीय पक्षांमध्ये वाण देण्यासाठी अक्षरश: स्पर्धा असते. मात्र आता राजकीयविरहित महिलांमध्येही ही वाण देण्यावरून चढाओढ दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. प्रत्येक महिलेने आपल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सण-उत्सव साजरा केले पाहिजे. कोणाला तरी दाखवण्यासाठी महागडे वस्तू देणे आणि ही स्पर्धा समाजहिताच्याद़ृष्टीने सकारात्मक नाही, याचा निश्चितच सर्वांनी विचार केला पाहिजे.