रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या प्रभाग क्रमांक ११ येथील जोशी पाळंद येथील नवीन उद्यानाची निर्मिती झाल्यानंतर शहराच्या खालच्या भागातील सौंदर्यात भर पडणार आहे. तब्बल ४९ लाख ८५ हजार रुपये खर्च करुन हे उद्यान बनवले जाणार आहे. शहराच्या खालच्या भागातील सौंदर्यात भर पडावी यासाठी इतरही कामे रत्नागिरी नगर परिषदेकडून लवकरच सुरु होणार आहेत. या कामांच्या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे.
रत्नागिरी शहराच्या खालच्या भागातील सुशोभिकरणासाठी चालना मिळाली आहे. शासनाने ८० लाख रुपयांचा वैशिष्टयपूर्ण निधी दिला आहे. यातून ५ विकासात्मक कामे घेण्यात आली आहेत. शहराचा खालचा भाग हा दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे येथील सुशोभिकरणाच्या कामांवर मर्यादा येतात. परंतू आता पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने स्मार्ट सीटीचा एक प्रकारे ध्यासच घेतला आहे.
जोशी पाळंद साई मंदीर येथील उद्यान विकसीत करण्याच्या कामाबरोबर प्रभाग क्रमांक १० मधील प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे खुली व्यायामशाळा विकसीत केली जाणार आहे. या व्यायामशाळे साठी १० लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहे. शनिवार आठवडाबाजार येथील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी पुरवठा विषयक कामे, प्रभाग क्र. ११ येथील मुरलीधर मंदीर जवळच्या उद्यानाजवळ पथदीवे आणि उद्यानात सोलर लाईट बसवण्यात येणार आहेत. प्रभाग क्र ३ च्या स्टेट बँक कॉलनीतील उद्यानात एलइडी लाईट खांब बसवले जाणार आहेत. या तीन्ही कामांचे अंदाजपत्रक १९ लाख ८८ हजार रुपयांचे आहे.