गुहागर : कोकणातील नाच म्हटल्यावर सगळ्यांचेच पाय थिरकतात. याचाच प्रत्यय गुहागर कीर्तनवाडी येथे राहणार्या मूळ नेपाळची असलेल्या नबिना हिच्या नृत्याने सध्या गुहागरवासीयांना येत आहे. कोकणातील सांस्कृतिक नाचांवर तिने सहाव्या वर्षीच प्रभुत्व मिळविले असून, तिचा नाच बघण्यासाठी ठिक़ठिक़ाणी सध्या गर्दी होत आहे.
गुहागरमध्ये खासगी बालवाडीत शिकणारी सहा वर्षीय नेपाळी मुलगी नबिना भीमराज वनटंकी हिला नृत्याची आवड आहे. सध्या ती गुहागर कीर्तनवाडी येथे वास्तव्यास आहे. गणपतीचे नाच, दसर्यातला गरबा, गोफ नृत्य अथवा जाखडी नृत्यात ती आवर्जून सहभाग घेते. नाचामध्ये तिने आता एवढे प्रावीण्य मिळवले आहे की त्या वाडीतील प्रत्येक नाचामध्ये तिला आवर्जून बोलावले जाते. मोठ्यांच्या नाचामध्ये तिचा सहभाग लक्षणीय असतो. हे सर्व पारंपरिक नृत्य प्रकार नबिना हिने बघून-बघूनच आत्मसात केले आहेत. नबिनाचे वडील गुहागरतील एका चायनीज सेंटरमध्ये आचारी म्हणून काम करीत आहेत. नबिनाला अभ्यासाबरोबरच कोकणातील लोककला संस्कृतीची ओढ असल्याचे ते सांगतात. नेपाळी भाषेबरोबरच मराठी भाषेवरही तिचे चांगलेच प्रभुत्व आहे. तिचे नाचाचे व्हिडीओ सध्या गुहागरात व्हायरल होत असून, त्याला दाद मिळत आहेत.