रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाराष्ट्रातील इंदापूर ते झाराप या ३५५ किलोमीटर मार्गावरील १० पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ११ हजार ४०९.१४ कोटी रुपये होता. हा खर्च आता १६ हजार ९०९.२२ कोटी रुपयांवर पोहोचला असून, तब्बल ५ हजार ५००.०८ कोटी रुपयांनी म्हणजेच सुमारे ४८ टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ११ हजार ५७७ कोटी रुपये खर्च झाले असतानाही काही महत्त्वाचे भाग अद्याप पूर्ण झालेले नाहीत. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
या खर्चवाढीचे सर्वाधिक ठळक उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाट–आरावली पॅकेजचे आहे. या पॅकेजचा मूळ मंजूर खर्च ९८३ कोटी रुपये होता. तो वाढून २ हजार २२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या पॅकेजच्या खर्चात तब्बल १२६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चिपळूण-रत्नागिरी पट्ट्यातील या मार्गावर काम सुरू असतानाही अनेक ठिकाणी अपूर्ण संरचना, वळणाचे रस्ते आणि बांधकाम क्षेत्रातून वाहतूक सुरू आहे.
महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबामागे भूसंपादनातील अडथळे, बांधकामपूर्व कामांना झालेला विलंब, विविध परवानग्या आणि काही कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. काही पॅकेजमध्ये कंत्राटदार बदलावे लागल्यानेही कामाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. दीर्घकाळ प्रकल्प रखडल्याने बांधकाम साहित्य, मजुरी, वाहतूक, यंत्रसामग्री तसेच भूसंपादन आणि पुनर्वसनाचा खर्च वाढण्याची शक्यता असते. मात्र, या प्रकल्पाच्या बाबतीत प्रत्येक पॅकेजमध्ये किती खर्च कशामुळे वाढला, याचा पॅकेजनिहाय स्पष्ट लेखाजोखा सार्वजनिक होणे आवश्यक आहे. महामार्गाच्या खर्चवाढीमुळे सार्वजनिक निधीच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मूळ अंदाजपत्रक तयार करताना भूसंपादन व अन्य पूर्वतयारीचा पुरेसा विचार झाला होता का, कंत्राट देण्यापूर्वी अडथळे का दूर झाले नाहीत आणि वाढीव खर्चाची जबाबदारी कोणाची, याची उत्तरे अपेक्षित आहेत.