लांजा : गेली चार ते पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश : झोडपले असून, अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटामध्ये दरड व संरक्षण भिंत पडली. त्यामुळे वाकेड घाटात मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक पूर्णतः ठप्प पडली होती. दरड पडल्याची माहिती महामार्ग विभागाला मिळताच जेसीबीच्या साह्याने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दरड अथक प्रयत्नानंतर हटविण्यात आल्यानंतर महामार्गावरील मुंबईच्या दिशेची रोडावलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
महामार्गावर वाकेड घाटात दरड पडलेल्या ठिकाणी एका बाजूने हलक्या स्वरूपाची वाहनांची वाहतूक सुरू होती. सोमवारी पहाटेच्या दरम्यान महामार्गावर वाकेड घाटात दरड पडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. लांजा तालुक्यात रविवारी सकाळपासून जोरदार वादळी पाऊस पडत आहे. याचा फटका तालुक्याला बसला असून, अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सोमवारी पडलेल्या पावसाचा फटका महामार्ग विभागालाही बसला. दरड पडलेल्या ठिकणी माती, दगड, झाडांच्या फांद्या मार्गावर पडल्याने रस्ता बंद पडला होता, तर हलक्या स्वरूपाची वाहतूक एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. अवजड वाहनांची वाहतूक महामार्गावर पूर्णतः बंद पडली होती. दरड पडल्याची माहिती नागरिक व वाहनचालकांनी महामार्ग प्रशासनाला दिल्याने सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान महामार्ग विभाग व ठेकेदार यांनी जेसीबीच्या सहाय्याने घाटात महामार्गावर पडलेली दरड व संरक्षक भिंत अथक प्रयत्नांनी हटवली. मुसळधार पाऊस सुरू असल्याने घाटात महामार्गावर पाण्याची प्रवाह सुरू राहिल्याने दरड बाजूला हटविण्यास अडथळा निर्मान झाला होता. दरड हटविल्यानंतर सकाळी 9.30 वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील मुंबईच्या दिशेने रोडावलेली अवजड वाहतूक पूर्ववत करण्यात आली.