चिपळूण : कोकणातील प्रवाशांना त्रास देणारा मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेचा आवाज कलात्मक माध्यमातून उठवला जात आहे. चिपळूण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवात प्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांनी महामार्गाच्या खड्ड्यातून होणार्या प्रवासाचे आणि कोकणवासीयांचा संताप व्यक्त करणारी विशेष रांगोळी साकारली आहे. सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.
संतोष केतकर हे केवळ रांगोळी साकारत नाहीत, तर आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर सातत्याने भाष्य करीत असतात. याआधी देखील त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रतिबिंब रांगोळीच्या माध्यमातून साकारले होते. तसेच, नवा कालभैरव मंदिरात त्यांनी हलती रांगोळी करून प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन वादनाचे दृश्य साकारले, ज्यामुळे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् 2022 मध्ये नोंद झाली होती. या नवीन रांगोळीमध्ये त्यांनी महामार्गावरील खड्ड्यांचा प्रत्यक्ष अनुभव दाखवला आहे.
गणपती बाप्पाच्या हातात ठेवलेल्या फलकांवर लिहिले आहे, चला गणराया, पाहाया रस्ता! खड्डे मोजू चला! तसेच जास्त खड्डे, जास्त निधी असे संदेश देऊन त्यांनी ठेकेदारांवरही हलकासा टोला मारला आहे. ही रांगोळी प्रवाशांच्या दैनंदिन संघर्षाचे, प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि समाजातील संतापाचे सजीव दृश्य तयार करते. स्थानिकांनी आणि कला रसिकांनी संतोष केतकरांच्या धाडसी कलाकृतीचे कौतुक केले आहे. रांगोळी माध्यमातून सामाजिक जागरूकता वाढवण्याची ही प्रयोगात्मक पद्धत कोकणातील एक नवीन प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.