mumbai goa highway construction status
खेड : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गोवा यांना जोडणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६) गेली तब्बल अठरा वर्षे चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. २००८ मध्ये मोठ्या गाजावाजात सुरू झालेला हा प्रकल्प आजही अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असून, कोकणवासीयांना अद्याप खड्डे, वाहतूक कोंडी, धोकादायक वळणे आणि रखडलेल्या पुलांचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरासह संपूर्ण कोकण पट्ट्यात महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत, उड्डाणपूल रखडले आहेत, तर काही ठिकाणी अर्धवट कामामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असून महामार्गावरील चिखल, धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही ठिकाणी प्रवाशांना दीड ते दोन तास एकाच ठिकाणी अडकून पडण्याची वेळ आली होती. वारंवार बदलल्या मुदतीमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हे कोकणातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानले जाते. मात्र, गेल्या अठरा वर्षांत अनेक सरकारे बदलली, केंद्रीय मंत्री बदलले आणि वारंवार नवीन डेडलाईन जाहीर करण्यात आल्या; तरीही काम पूर्ण झालेले नाही. नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी रखडलेल्या टप्प्यांना आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
आरवली-कांटे आणि कांटे-वाकेड हे महत्त्वाचे टप्पे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. विलंबामुळे प्रकल्प खर्चात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगण्यात आले होते.
पावसाळ्यात वाढतो धोका
महामार्गावरील अपूर्ण कामामुळे दरवर्षी पावसाळ्यात परिस्थिती गंभीर बनते. काही भागांमध्ये दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः रायगड जिल्हा येथील काही घाट भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्याचे वृत्त आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते अडचणीचे ठरत आहेत.
कोकणातील पर्यटन हंगाम, गणेशोत्सव आणि सुट्यांच्या काळात महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो. अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
गेल्या महिनाभरातील भीषण अपघातांची नोंद
मुंबई-गोवा महामार्ग आणि जोड घाटमार्गांवर गेल्या महिनाभरात अनेक गंभीर अपघात घडले आहेत. त्यामुळे बांधण्यात आलेला चारपदरी राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित आहे का, असा सवालही प्रवासी उपस्थित करत आहेत.
अजून किती वाट पाहायची...?
महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. तरीही अनेक भागांमध्ये अपूर्ण काम, खराब सेवा रस्ते, खड्डे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोकणवासीय, वाहनचालक आणि व्यावसायिक आता एकच प्रश्न विचारत आहेत - मुंबई-गोवा महामार्गाचा हा रखडलेला प्रवास अखेर पूर्ण कधी होणार?