बोरज गावाजवळील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल. 
रत्नागिरी

Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गाला १८ वर्षे झाली तरी अनेक कामे अपूर्णच

सर्व्हिस रोड, अंडरपास, पादचारी पूल कधी पूर्ण होणार? मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम

पुढारी वृत्तसेवा

अनुज जोशी

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला तब्बल १८ वर्षांचा कालावधी उलटूनही महामार्गावरील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्णच असल्याने कोकणवासीयांचा प्रवास धोकादायक बनला आहे. अनेकठिकाणी सर्व्हीस रोड अर्धवट आहेत, तर महामार्ग ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल आणि अंडरपासची कामेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे उलटली असून कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतरही महामार्गावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले सर्व्हीस रोड अनेकठिकाणी अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिकांना मुख्य महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांच्यात संघर्ष निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.

महामार्ग ओलांडण्यासाठी आवश्यक असलेले पादचारी पूल अनेकठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह नागरिकांना सुरक्षित पर्याय उपलब्ध नसल्याने धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडावा लागत आहे. या मार्गावर यापूर्वीही महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. अर्धवट किंवा अपुर्‍या निचरा व्यवस्थेमुळे काही अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचत असून काही ठिकाणी ते पाण्याने भरून वाहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना अंडरपासचा वापर करणे अवघड होत असून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. चौपदरीकरणाचा उद्देश प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद करणे असताना अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याने महामार्गाचे चौपदरीकरण प्रवाशांच्या सोयीसाठी की अडचणी वाढवण्यासाठी? असा सवाल कोकणवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नुकत्याच कोकण दौर्‍यावर आलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर टीका केली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अनेक वर्षे उलटूनही प्रवाशांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहेत. यासोबतच पर्यटकांचीही मोठी वर्दळ मुंबई-गोवा महामार्गावर वाढणार आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण सर्व्हिस रोड, अंडरपास, पादचारी पूल आणि विविध ठिकाणी सुरू असलेली कामे यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवाशांच्या गैरसोयीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवापूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करा

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील अपूर्ण कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावीत, धोकादायक ठिकाणी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी तसेच पाणी साचणार्‍या अंडरपासची समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणार्‍या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासन व महामार्ग प्राधिकरण यंदा तरी ठोस पावले उचलणार का? याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT