गुहागर : गुहागर तालुक्यामध्ये एअरटेलची केबल आणि महावितरणची केबल रोडच्या बाजूने टाकण्याचे काम सुरू आहे. केबल टाकताना पूर्वीचे गटार बंद करण्यात आल्याने त्याचा फटका काही गावांना पावसाळ्यात बसला आहे.
गुहागर तालुक्यातील सागरी महामार्गावर असणार्या नरवण गावाला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. अती मुसळधार पाऊस झाल्याने कातळावर जे पाणी साचले ते वेगाने उताराच्या बाजूने आल्याने रोडच्या बाजूला असणारी माती एकदम रस्त्यावर आली. त्यामुळे नरवण गावाच्या बाजारपेठेतील रस्त्यावर मातीचा थर जमा झाला. नरवण गावच्या नदीला पूर आल्याने संपूर्ण पाणी बाजारपेठेमध्ये घुसले होते. तसेच काही लोकांच्या घरामध्येही मातीचे पाणी आणि माती गेल्याची घटना घडली आहे. केबल टाकताना पूर्वीचे गटार बंद केल्यामुळे पाणी गटाराच्या बाजूने न जाता पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे मातीही रस्त्यावर आली आणि पाण्याचा वेग एवढा होता की पाण्याबरोबर मातीचा थर रस्त्यावर जमा झाल्याने दुचाकीस्वारांनी हातात दुचाकी घेऊन मार्गक्रमण केले.