चिपळूण शहर : शहरानजीकच्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे पाणकरवाडी येथील नागरी वस्तीसह शेतांमध्ये मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने शेतीसह नागरिकांचे नुकसान झाले आहे. हा भराव परशुराम घाटातील महामार्गासाठी संरक्षक भिंतीसाठी करण्यात आला होता. मात्र, मागील तीन दिवस चिपळूण शहर परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे मातीचा भराव वाहून आल्याने या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
संपूर्ण नागरी वस्तीसह शेतीजमिनीत दलदल निर्माण झाली आहे. वाडीतील नागरी वस्तीत जाणार्या रस्त्यावर तसेच भाजीपाला, भातशेती जमिनीत मोठ्या प्रमाणात दगड आणि चिखल पसरला आहे. त्यामुळे वाडीतील नागरिकांना शेतजमिनीसह अन्यत्र जाण्यासाठी गुडघाभर चिखल तुडवावा लागत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात दगड-गोटे वाहून आल्यामुळे शेतजमिनीची हानी झाली आहे. परशुराम घाट रूंदीकरण अंतर्गत संरक्षक भिंतीसाठी अनेक ठिकाणी संरक्षक भिंत व उंची वाढ वण्यासाठी मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव करण्यात आला आहे. याच भरावाची दगड-गोटे, माती गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्या जोरदार पावसामुळे वाहून जात आहे.
त्यातील भरावाचा काही भाग पेढे पाणकरवाडीत जोरदार पावसाच्या प्रवाहाच्या पाण्याबरोबर पसरला आहे. सद्यस्थितीत वाडीमध्ये भरावाच्या मातीचा चिखल काढण्यासाठी वाडीमधील ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण शेतजमिनीसह वाडीत पसरलेला हा भराव काढण्याकरिता मोठ्या यंत्रसामुग्रीची गरज असून प्रशासनाने तातडीने यावर वेळी उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, हा भराव प्रशासन कधी काढणार आणि आपला त्रास कधी कमी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.