रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एसटी बस स्थानकापासून विभागीय कार्यालयामार्फत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी आगारासह अन्य आगारात 24 ते 25 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
एसटी महामंडळाने बसस्थानकावर प्रवाशांसह महिला सुरक्षेला प्राधान्य देत संशयास्पद हालचालींसह चोरी व गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे राज्यभरात डिजिटल कवच उभारण्यात येणार आहे. टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंटस इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीमार्फत वर्षभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत बसस्थानके, विभागीय कार्यालये, कार्यशाळा, आगारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील प्रत्येक हालचालींवर सतत नजर राहणार आहे. संशयास्पद हालचाल वाटल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 9 आगारांत बसस्थानके असून याशिवाय पाली, संगमेश्वर, पावस, गणपतीमुळे, माखजन या बसस्थानकतही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे. दरम्यान, बसस्थानकांसह विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्यानंतर मुंबईत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.