रत्नागिरी: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'मोंथा' (Monthi) चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला 'यलो अलर्ट' जारी केला आहे. जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची शक्यता असून, पुढील आणखीन दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या हवामानाचे स्वरूप धोकादायक बनले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने समुद्र खवळलेला आहे. परिणामी, रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल रात्री देखील जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. किनारपट्टी भागात ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, सकाळपासूनच हवामान ढगाळ झालेले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.
या 'यलो अलर्ट'च्या आणि समुद्रातील धोकादायक स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना व विशेषत: मच्छीमारांना तातडीने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मच्छीमारांना आज देखील खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची धोका टाळता येईल.