रत्नागिरी : मुंबई व ग्रामीणच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलण्यासाठी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार आणि स्वयं-पुनर्विकास (सेल्फ-रिडेव्हलपमेंट) या दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रांना बळकटी देण्याची घोषणा आमदार प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरीतून केली. सहकार क्षेत्राच्या बळावर स्थानिक उद्योगांना आर्थिक ताकद देणे आणि गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं-पुनर्विकासाला प्रोत्साहन देऊन मुंबईतील मराठी माणसाला तिथेच थांबवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जाहीर केल्या.
आमदार दरेकर यांनी राज्य सहकारी संघाच्या कोकणातील जिल्हा बोर्डाच्या विभागीय बैठकीत कोकणातील सहकार क्षेत्राचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी विदर्भ आणि इतर भागातील यशस्वी सहकारी बँकांचा अभ्यास करून, कोकणातील संस्थांसाठी एक विशेष सक्षम कृती आराखडा तयार करण्याची घोषणा केली.
सध्या कोकणात अपेक्षेनुसार कामगिरी न करणार्या काजू प्रक्रिया उद्योग किंवा पतसंस्थांना भविष्यात आर्थिक ताकद दिली जाईल. तसेच, पर्यटन यांसारख्या मोठ्या संधींना सहकारी तत्त्वावर उभे करून त्यांना अर्थबळ पुरवले जाईल. राज्याच्या सहकार शिखर संस्थेचे नेतृत्व करत असताना, कोकणातील जिल्हा बँकांना एकत्र आणून मोठे विभागीय प्रकल्प उभारले जातील आणि लाडक्या बहिणींना उद्योजक बनवण्यासाठी आवश्यक अर्थपुरवठा केला जाईल. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि आवश्यकतेनुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक या प्रकल्पांना अर्थसहाय्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोकणात सध्या अ वर्गात असलेल्या 5 जिल्हा बँका आणि उत्तम चालणार्या संस्थांना एकत्र आणून दहा नवीन सहकारी संस्था उभ्या करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. याशिवाय, कोकणातील काजू, नारळ, कोकम आणि मासेमारी या उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी सरकारचे अर्थसहाय्य आणि बँकेचा पुरवठा यांचा समन्वय साधला जाईल. सहकार चळवळीला पायाभूत स्तरावर मजबूत करण्यासाठी लवकरच कोकण विभागासाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.