रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात सोमवारी भल्या पहाटे अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाचा हातोडा पडला. पोलिसांच्या बंदोबस्तात पहाटे 5.45 पासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवरील व्यापारीद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मिरकरवाडा बंदराला मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणाने व्यापून टाकले हाते. त्यामुळे या बंदराचे विस्तारीकरण रखडले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौर्यामध्ये या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देत, बंदराला अनधिकृत बांधकामांपासून मुक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छीमारी बंदर असा लौकिक असलेले मिरकरवाडा बंदराची प्रगती खुंटली होती. 25 एकरच्या या बंदर परिसराला अनधिकृत बांधकामांनी वेढा घातला होता. छोट्या, मोठ्या झोपड्या, पक्की बांधकामे मिळेल त्या जागेत उभारली होती. यात टीव्ही, एसी लावून सुसज्ज खोल्याही उभारल्या होत्या. जागा मत्स्य व्यवसाय विभागाची असूनही भाडे मात्र दुसरेच घेत होते. यातून या विभागाला काही उत्पन्न मिळत नव्हते.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी अशी कारवाई झाली होती. त्यानंतर गेली 15 वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी कारवाईही झाली नव्हती. मिरकरवाडा विकासाचा दुसरा टप्पाही निधीअभावी रखडला होता. त्यामुळे सातत्याने या भागात अनधिकृत बांधकामे वाढत होती.
राज्याचा मत्स्य व बंदर विभागाचे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर रत्नागिरीत आलेल्या ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागाची बैठक घेत, ही बांधकामे तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जवळपास 319 बांधकामांना मत्स्य विभागाने नोटीस बजावली होती. ही बांधकामे हटवू नयेत, यासाठीही मच्छीमारांकडून प्रयत्न झाला होता.
मात्र, बंदराच्या विकासासाठी बांधकामे हटवणे महत्वाचे असल्याचे अधिकार्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही स्पष्ट केले होते. त्यामुळे शनिवार व रविवारी काही मच्छीमारांनी स्वत:हून बांधकामे हटवली होती. मात्र, पक्की बांधकामे तशीच ठेवली गेली होती.
सोमवारी पहाटे 5.30 वा. पोलिस बंदोबस्तात मत्स्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी 5 जेसीबी घेऊन मिरकरवाडा बंदरात दाखल झाले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, पोलिस निरीक्षक शिवरेकर यांच्यासह अडीचशेहून अधिक पोलिस कर्मचारी, सागरी सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी उपस्थित होते. मिरकरवाडा बंदरात येणारे तीनही मार्ग पोलिसांनी रहदारीसाठी बंद केले होते. सकाळी 5.45 वाजता. सहाय्यक संचालक व्ही. एम. भादुले, सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांच्यासह निरीक्षक व अन्य अधिकार्यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरु करण्यात आली.
पहिल्या जेटीजवळ समुद्रकिनार्यालगत असणारी मोठी शेड पाडून कामाला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला प्रत्येक जेसीबीसह पाच पथके तयार करण्यात आली आणि पाडकामाला वेग देण्यात आली. ही जेसीबी मशिन कमी पडत असल्याचे सहा. आयुक्त पालव यांच्या लक्षात आल्यानंतर आणखी दोन जेसीबी मागवून अनधिकृत कामे हटवण्यास वेग देण्यात आला. सकाळी 11 वाजेपयर्र्त 70 टक्के कामे पाडण्यात आली होती. बंदरात ठेवण्यात आलेल्या छोट्यामोठ्या होड्याही मच्छीमारांनी प्रशासनाच्या मदतीने उचलून बाहेर नेल्या. सायंकाळी 6 वाजेपयर्र्त सूर्यास्त्यावेळी ही कारवाई थांबवण्यात आली.
ही पाडकामे सुरु असताना अनेक नागरिक बंधिस्त भिंतीवरुन, बंदरालगत असणार्या ब्रेकवॉटरवॉल वरुन पहात होते. या सर्वांनाच पोलीस यंत्रणा घटनास्थळावरुन बाजूला जावे म्हणून वारंवार आवाहन करीत होते.सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बंदरात येत मोहिमेची पाहणी केली व अधिकार्यांना सूचना केल्या.
या ठिकाणी दहा बाय दहापासून मोठ्या झोपड्या व पक्की बांधकामे, शेड उभारण्यात आली होती. यातील अनेक झोपड्या, खोल्या बांधून त्या भाड्याने देण्यात आल्या होत्या. तीन हजारपासून अगदी पंचवीस हजारांपर्यंत त्याचे भाडे द्यावे लागत होते. जागा मत्स्य व्यवसाय विभागाची असूनही भाडे मात्र दुसरेच खात होते.