रत्नागिरी : नागरिकांचे रस्ते आणि पाणी कोणी अडवू शकत नाही. वारंवार रस्ते अडवण्याच्या तक्रारी येत असल्याने गरज भासल्यास ग्रामसभा लावा; परंतु जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पायवाटा, पाणंद रस्ते, पारंपरिक रस्ते किती आहेत, त्याचा सर्व्हे करावा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सामंत यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच नागरिक उपस्थित होते.
गुंतवणुकीचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झालेल्या आरजू कंपनीतील गुंतवणूकदार याठिकाणी मोठ्या आशेने आले होते. मंत्री सामंत यांनी त्यांना निराश केले नाही. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली. महिन्याभरात चौथ्या आरोपीला अटक झाली पाहिजे, अशी सूचना सामंत यांनी दिली.